Login

“शंभर चांगुलपणावर पडलेली एका चुकीची सावली”

लोक काय लक्षात ठेवतात, यावर आपलं आयुष्य ठरू नये; तर आपण स्वतः काय आहोत, यावर आपलं जगणं ठरावं. कारण शंभर चांगल्या गोष्टी विसरल्या गेल्या तरी, त्या आपल्या मनात जिवंत असतील तर तेच पुरेसं आहे.
“शंभर चांगुलपणावर पडलेली एका चुकीची सावली”..लेखक: सुनिल जाधव पुणेTM 9359850065

लोकं पण कशी असतात ना… त्यांच्या साठी आपण केलेल्या शंभर चांगल्या गोष्टी क्षणात विसरतात, पण आपल्या आयुष्यातून नकळत घडलेली एक छोटीशी चूक मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतात. हीच तर माणसाच्या मनाची विचित्र रचना आहे. चांगुलपणाची सवय होते, त्याची किंमत राहात नाही; पण चूक मात्र डोळ्यांत खुपसल्यासारखी सतत टोचत राहते.

आपण एखाद्यासाठी वेळ दिला, साथ दिली, अडचणीत उभे राहिलो, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मदत केली… त्या सगळ्या गोष्टी ‘आपण करायलाच हव्या होत्या’ या गृहितकात जमा होतात. कारण चांगलं वागणं हे आपलं कर्तव्य मानलं जातं. पण एखाद्या क्षणी थकलो, चिडलो, काही बोलणं चुकलं, किंवा अपेक्षेप्रमाणे वागता आलं नाही… तेव्हाच तो क्षण कायमचा ठसा उमटवतो. मग त्या एका चुकीच्या क्षणावरून आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व मोजलं जातं.

खरं तर माणूस चुका करणारा जीव आहे. भावना आहेत, मर्यादा आहेत, मनाच्या कडा आहेत. पण समाजाला बहुतेक वेळा हे समजून घ्यायचं नसतं. कारण चूक शोधणं सोपं असतं, समजून घेणं कठीण. एखाद्याच्या चांगुलपणाकडे पाहण्यासाठी मन मोठं लागतं, पण दोष दाखवायला फारसं काही लागत नाही.

यात सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वात जवळचे लोकच अनेकदा त्या एका चुकीला धरून बसतात. आपलं आयुष्य, आपली निष्ठा, आपली माया सगळं बाजूला ठेवून, “तेव्हा तू असं केलंस” एवढ्यावरच नात्याचं गणित मांडलं जातं. मग आपण कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरी ते अपुरेच ठरतात.

मात्र यावर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, लोकांनी आपली चूक आयुष्यभर लक्षात ठेवली, म्हणून आपण स्वतःला अपराधी मानत बसू नये. कारण ज्यांना फक्त आपली चूक दिसते, त्यांना आपली माणुसकी कधीच दिसणार नाही. आणि ज्यांना आपली माणुसकी दिसते, ते त्या चुकीकडेही समजून पाहतील.

म्हणूनच प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. चांगलं करा, मनापासून करा; पण त्याची पावती लोकांकडून मिळेलच, अशी अपेक्षा ठेवू नका. कारण आपली किंमत आपण स्वतःच ओळखली नाही, तर लोक ती एका चुकीत गुंडाळून फेकायला वेळ लावणार नाहीत.

शेवटी एकच सत्य उरतं, लोक काय लक्षात ठेवतात, यावर आपलं आयुष्य ठरू नये; तर आपण स्वतः काय आहोत, यावर आपलं जगणं ठरावं. कारण शंभर चांगल्या गोष्टी विसरल्या गेल्या तरी, त्या आपल्या मनात जिवंत असतील तर तेच पुरेसं आहे.
लेखक: सुनिल जाधव पुणेTM 935 985 0065, topsunil@gmail.com
0